Thursday 21 May, 2009

मराठी चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने

येत्या ३० मे रोजी पुण्यात ४६ वा राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळा पार पडणार आहे. त्या पार्श्‍वभूमीवर मराठी चित्रपटांचा महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तब्बल २४ मराठी चित्रपट पहायची संधी पुणेकरांना उपलब्ध झाली आहे. २२ मे ते २९ मे या दरम्यान गणेश कला-क्रीडा मंच आणि सिटीप्राईड, कोथरूड येथे हे चित्रपट पहायला मिळतील. (अधिक माहिती साठी वृत्तपत्रे पहा).

महोत्सवात खालील चित्रपट पाहायला मिळतील...

०१. अग्निदिव्य (प्रिमिअर) - चिं. त्र्यं. खानोलकर यांच्या 'अगोचर' कादंबरीवर आधारित
०२. गाभ्रीचा पाऊस
०३. घो मला असला हवा
०४. हरिश्‍चंद्राची फॅक्‍टरी
०५. टिंग्या
०६. वळू
०७. गुलमोहर
०८. मर्मबंध
०९. बेधुंद
१०. एवढेसे आभाळ
११. चेकमेट
१२. गंध
१३. कदाचित
१४. धुडगूस
१५. साडेमाडेतीन
१६. उलाढाल
१७. दे धक्का
१८. एक डाव धोबीपछाड
१९. जोगवा
२०. मी शिवाजीराजे भोसले बोलतोय
२१. वासुदेव बळवंत फडके
२२. मेड इन चायना
२३. फॉरेनची पाटलीण
२४. जाऊ तिथे खाऊ

मराठी चित्रपट बघायचे आहेत, पण कुठले बघायचे ते कळत नाही, असं बर्‍याच जणांनी वेळोवेळी सांगितलं. महाराष्ट्रातच रहाणार्‍यांचं ठीक आहे; पण महाराष्ट्राबाहेर किंवा देशाबाहेर रहात असताना मराठी चित्रपटांबद्दल पुरेशी माहिती कळत नाही आणि बरेच उपद्व्याप करून (म्हणजे internet वरून pirated copy download करून!!) एखादा चित्रपट पैदा करावा तर तो असा भंगार निघतो की विचारता सोय नाही, असंही सुनावलं गेलं. (खरंतर महाराष्ट्रातच रहाणार्‍यांपर्यंतही मराठी चित्रपटांची पुरेशी माहिती पोचत नाही. पण ते जाऊदे.)

काही चांगल्या चित्रपटांबद्दल सविस्तर लिहायचा बेत बरेच दिवस तसाच भिजत पडला आहे. तो पूर्ण होईल तेव्हा होवो. पण या महोत्सवाच्या निमित्ताने कोणाला चित्रपट बघायचे असल्यास काही चांगली नावे तरी हाताशी असावीत म्हणून मी बघितलेल्या काही चित्रपटांबद्दल येथे थोडक्यात लिहीत आहे. श्रेणी आणि मतं अर्थातच माझी वैयक्तिक आहेत; त्यामुळे त्यावर मतभेद शक्य आहेत. मला आवडलेला चित्रपट एखाद्याला आवडला नाही किंवा याउलट झाले तरी माझी काही हरकत नाही. तसे झाल्यास तुमची मते खुशाल या ब्लॉगवर नोंदवा.

दर्जेदार (****) - पहाच!!

चित्रपटदिग्दर्शकथोडक्यात
वळूउमेश कुलकर्णीhttp://naviprabhat.blogspot.com/2008/01/valu-wild-bull.html
वास्तुपुरूषसुमित्रा भावे - सुनील सुकथनकरhttp://naviprabhat.blogspot.com/2008/04/blog-post.html
हरिश्चंद्राची फॅक्टरीपरेश मोकाशीअप्रतिम. पहाच!!
टिंग्यामंगेश हाडवळेकाळजाला भिडणारा अस्सल मराठी चित्रपट. बघाच! "माझे आभाळ तुला घे" हे गाणेही छान
देवराईसुमित्रा भावे - सुनील सुकथनकरसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा आणखी एक उत्तम चित्रपट. अतुल कुलकर्णीने कमालच केली आहे. मात्र मधेच थोडा वेळ माहितीपट बघितल्यासारखं वाटतं
डोंबिवली फ़ास्टनिशिकांत कामतनिशिकांत कामतचा पहिला चित्रपट (दुसरा मुंबई मेरी जान). थेट अर्धसत्यची आठवण करून देणारा. संदीप कुलकर्णी एकदम छान
पक पक पकाकगौतम जोगळेकरसुंदर कथा, नाना पाटेकर आणि सर्वांवर कडी करणारा सक्षम कुलकर्णी. मुलांबरोबर बघा.
कथा दोन गणपतरावांचीअरूण खोपकरहा खरंतर १४-१५ वर्षांपुर्वीचा चित्रपट. पण पाहिला नसेल तर जरूर पहा. दर्जेदार कथा आणि चटका लावणारा शेवट. गाणीही धमाल.


चांगला (***) - पहाण्यासारखा

चित्रपटदिग्दर्शकथोडक्यात
नितळसुमित्रा भावे-सुनील सुकथनकरसुमित्रा भावे-सुनील सुकथनकर जोडीचा आणखी एक उत्तम चित्रपट. संवेदनशील आणि संयत.
एक ऊनाड दिवसविजय पाटकरसाधीशीच पण उत्तम कथा. सादरीकरणही कथेला साजेल असेच. मात्र तांत्रिक बाबतीत कमी.
दहावी फसुमित्रा भावे-सुनील सुकथनकरमुलांबरोबरच मोठ्यांनीही बघायला हरकत नाही. गाणीही मुलांना आवडतील अशीच धमाल.
उलाढालआदित्य सरपोतदारउत्तम मराठी mainstraem चित्रपट. निखळ मनोरंजन. त्यावर अजय-अतुलचं संगीत. "मोरया मोरया" हे गाणं ऐकाच.
श्वाससंदीप सावंतराष्ट्रीय पुरस्कारविजेता चित्रपट. आणखी काय बोलणार!!
लिमिटेड माणुसकीनचिकेत - जयू पटवर्धनहा खरंतर १४-१५ वर्षांपुर्वीचा चित्रपट. पण एक वेगळी Black comedy म्हणून बघायला हरकत नाही.
बिनधास्तचंद्रकांत कुलकर्णी१० वर्षे जुना. १९९९ चा असला तरी माझ्यामते मरगळलेल्या मराठी चित्रपटाला नव्या शतकाकडे नेणारा पहिला mainstream मराठी चित्रपट.
सावरखेड एक गावराजीव पाटीलचांगला mainstraem रहस्यपट. तगडी starcast. अजय-अतुल नेहेमीप्रमाणे अविस्मरणीय. "वार्‍यावरती गंध पसरला".
काय द्याचं बोलाचंद्रकांत कुलकर्णीचांगला जमून आलेला विनोदी चित्रपट. एक दोन प्रसंग तर खूपच हसवतात.
चेकमेटसंजय जाधवतांत्रिक दृष्ट्या चकचकीत. पण कथा जितकी अवघड आहे तेवढी परिणामकारक नाही. पण Race, Singh is King सारखे फालतु हिंदी चित्रपट पाहण्यापेक्षा केव्हाही चांगला.


ठीक (**) - पहायला हरकत नाही

चित्रपटदिग्दर्शकथोडक्यात
अगं बाई अरेच्चाकेदार शिंदेतांत्रिक बाजू चांगल्या. पण एकूण चित्रपट तसा ठीकच. अजय-अतुलचं संगीत मात्र एकदम अफलातून. बघणार नसाल तरी Audio CD आणाच.
मी शिवाजीराजे भोसले बोलतोयसंतोष मांजरेकरपहायला हरकत नाही. जितका गवगवा झाला तितका काही चांगला नाही. पण व्यावसायिक दृष्ट्या इतके यश मिळवणे ही देखील काही कमी गोष्ट नाही. चित्रपट तांत्रिक बाबीत हिंदी चित्रपटाइतकाच चकचकीत आहे. सचिन खेडेकर छान.
चकवाजतिन वागळेबर्‍यापैकी चांगला रहस्यपट आणि अतुल कुलकर्णी. "अजून उजाडत नाही गं" हे गाणं अप्रतिम. ही संदीप खरे - सलील कुलकर्णीची किमया.
अचानकचंद्रकांत कुलकर्णीचित्रपट थोडाफार नाटकासारखा वाटतो. पण एकंदरीत चांगला आहे. शेवटचा उलगडा फारसा परिणामकारक वाटत नाही.
सनई चौघडेराजीव पाटीलठीक-ठाक. कथेत फारसा दम नाही. आणि काही प्रसंग अगदी शब्दबंबाळ. अवधुत गुप्तेचं कांदेपोहे हे शीर्षकगीत छान.
एक डाव धोबीपछाडसतीश राजवाडेफार धमाल विनोदी प्रसंग नाहीत. मात्र फार पांचटही नाहीत.
मातीच्या चुलीसुदेश मांजरेकर - अतुल काळेचकचकीत चित्रपट. कलाकारांचा अभिनयही छान. मात्र पटकथा फारशी बांधीव आणि एकसंध नाही.
अनाहतअमोल पालेकरकथेत फारसा punch नाही. मात्र दिग्दर्शन आणि संगीत उल्लेखनीय.
सातच्या आत घरातसंजय सूरकरकाही प्रसंग अगदी शब्दबंबाळ आणि प्रचारकी. बाकी ठीक-ठाकच.
दे धक्कासुदेश मांजरेकर - अतुल काळेचकचकीत चित्रपट. मात्र पटकथा अगदीच विस्कळीत. गाणी छान, मात्र त्यात A R Rahmaan च्या संगीताची उचलेगिरी फार. सिद्धार्थ जाधव धमाल.
बोक्या सातबंडेराज पेंडुरकरसुट्टीत मुलांनी हट्ट धरला तर न्यायला हरकत नाही


तद्दन भिकार (*) - पाहु नका

चित्रपटदिग्दर्शकथोडक्यात
माझा नवरा तुझी बायकोकेदार शिंदेखरंतर एकदम बिनडोक comedy. पण समोर लागलाच तर सिद्धार्थ जाधवला बघा.
आईशप्पथसंजय सूरकरठाव न घेणारी फसलेली कथा. मानसी साळवी दिसलीय छान. अंकुश चौधरी आणि श्रेयस तळपदे उत्तम. अशोक पत्कींचं "दिस चार झाले, मन पाखरु होऊन" हे गाणं सरस.
सखीसंजय सूरकरचांगल्या विषयाचं वाट्टोळं. आणि त्यामुळे अशोक सराफ, सोनाली कुलकर्णी सारखे ताकदीचे कलाकार उगाचच वाया गेलेत.
जत्राकेदार शिंदेबिनडोक comedy. डोकं बाजूला ठेवूनही पुर्ण बघवला नाही. अजय-अतुल मात्र पुन्हा अफलातून. "कोंबडी पळाली" आणि "ये गो ये मैना".
तुला शिकविन चांगलाच धडागिरीश मोहितेजुन्या "चुपके चुपके" ची भिकार नक्कल. "डिपाडी डिपांग" मात्र सरस. सलील कुलकर्णी आणि संदीप खरे, तुमची बहुमोल गाणी असल्या चित्रपटांवर वाया घालवू नका.
सैलगजेंद्र अहिरेगंभीर चित्रपट असला म्हणुन काही लगेच चांगला चित्रपट होत नाही.
दोघात तिसरा आता सगळं विसराकांचन अधिकारीबिनडोक comedy. अजिबात बघु नका
जाऊ तिथे खाऊअभय किर्तीमोठा सामाजिक विनोद केल्याचा आव आणणारा प्रत्यक्षात अत्यंत फालतु चित्रपट. अजिबात बघु नका
चश्मेबहाद्दरविजय पाटकरबिनडोक comedy. अजिबात बघु नका. एक उनाड दिवस सारखा चांगला चित्रपट याच दिग्दर्शकाने बनवला असेल यावर विश्वासच बसत नाही.
नवरा माझा नवसाचासचिन पिळगावकरHit झाला असला म्हणून काय झालं? सचिनचा असला तरी अशीही बनवाबनवी वगैरेची सर नाही. डोकं बाजूला ठेवून बघा.

Sunday 27 April, 2008

वास्तुपुरुष - पडद्यावरची कादंबरी

साहित्याच्या प्रांतात जसा 'कला ही कलेसाठी का जीवनासाठी' हा वाद न संपणारा आहे, तसाच 'चित्रपटाने करमणूक करावी का बोध करावा' हा वाद देखील निरंतर आहे. पण कधीतरी 'रथचक्र' सारखी एखादी कादंबरी असा काही उत्कट, सलग आणि सच्चा अनुभव घेऊन येते की हा सगळा वादच निरर्थक होऊन जातो. कलाकृती ही अनुभवण्यासाठी एवढं एकच उत्तर उरतं. अगदी असाच, जणु एखादी परिणामकारक कादंबरी वाचावी तसा, अनुभव 'वास्तुपुरुष' पाहताना येतो.

पूर्ण तीन तास लांबीचा हा चित्रपट वरवर पहावा तर अगदी संथ (कादंबरीच्या लयीचा) आणि नाट्यमय घटना, योगायोग, कलाटणी वगैरे सहसा अपेक्षित गोष्टींचा अजिबात समावेश नसलेला. पण कुठल्याही साध्या सरळ गोष्टीलाही वास्तव जीवनात जसे अनेकविध सुसंगत विसंगत पदर असतात, तसे कथानकाचे अनेक अंत:प्रवाह विसंवादी पात्रांद्वारे अलगदपणे समोर येत रहातात आणि चित्रपटाची पूर्ण चौकट भरून टाकतात.


मुंबईत केलेल्या सामाजिक कार्याबद्दल डॉ. भास्कर इनामदार यांना मॅगसेसे पुरस्कार जाहीर होतो आणि ४० वर्षांनी अचानक डॉक्टरांना गावची ओढ लागते. अमेरिकेहून सहकुटूंब भेटायला आलेल्या मुलासोबत ते गावी जातात. गेली अनेक वर्षे वापरात नसलेल्या त्यांच्या पडक्या वाड्याचा दरवाजा उघडतात. आणि आठवणींचा बांध फुटतो. इनामदारांच्या भरल्या वाड्यातला विद्यार्थी भास्कर दिसायला लागतो.

भास्कर स्वभावाने शांत समजूतदार आणि अभ्यासात हुशार. पण भोवतालच्या परिस्थितीमुळे मनात उसळणारी वादळे चेहर्‍यावर येऊ न देणारा. आई, बाबा, काका, दादा, कृष्णाताई या सर्वांची वेगवेगळ्या कारणांनी होणारी ओढाताण तो पहातो. पण समोरासमोर कोणतीही प्रतिक्रिया देत नाही. संपूर्ण चित्रपटभर तो एक निरीक्षक (observer) म्हणून वावरतो. त्याच्या नजरेतून आपणही घरातील आणि गावातील एक एक व्यक्ती पहात जातो.

इनामदारांचा वाडा हा या चित्रपटातील एक पात्रच आहे. (वास्तुपुरुष हे नाव त्या दृष्टीने अत्यंत सार्थ आहे.) संजय मेमाणे यांच्या कॅमेर्‍याने आणि श्रीरंग उमराणी यांच्या पार्श्वसंगीताने हे पात्र अगदी जिवंत करून ठेवलंय. एवढं परिणामकारक आणि नेमकं छायाचित्रण मराठीत मी तरी क्वचितच पाहिलंय. काश्मिर-स्वित्झर्लंड ची निसर्गशोभा चित्रित करणं वेगळं आणि एका जुन्या प्रशस्त वाड्याला त्याच्या बर्‍यावाईट गुणवैशिष्ट्यांसह चित्रित करून स्वतंत्र व्यक्तिमत्व मिळवून देणं वेगळं. चित्रपटातील दोन्ही गाण्यांनी ग्रामीण लोकसंगीताचा बाज छान उचलला आहे. (अतुल कुलकर्णीने मात्र त्यांत थोडी over-acting केली आहे.)


पूर्वजांनी केलेल्या कर्मांमुळे हा वास्तुपुरुष अशांत झाला आहे आणि त्यामुळेच आजचे कठीण दिवस बघावे लागत आहेत अशी पारंपारिक श्रद्धा भास्करच्या आईची आहे. काहीही करून भास्करला डॉक्टर करायचा ध्यास तिने घेतला आहे. डॉक्टर होऊन भास्कर समाजाची सेवा करेल तेव्हाच हा वास्तुपुरुष शांत होईल अशी तिची धारणा आहे. उत्तरा बावकरांनी ही व्यक्तिरेखा ज्या ताकदीने उभी केली आहे ते पाहून मराठीतील (रंगभूमीमुळे तयार झालेली) अभिनयाची अफ़ाट गुणवत्ता दिसून येते.

स्वातंत्र्यानंतर निर्माण झालेल्या संधीसाधु प्रवृत्तीमुळे व्यवहारशून्य ठरू लागलेला गांधीवादी आदर्शवाद आणि न पटणारा व्यवहारवाद यांच्या कात्रीत अडकून हतबल झालेले वडील आणि त्यांची अगतिकता सदाशिव अमरापूरकरांनी नेहेमीच्या सहजपणे उभी केली आहे.

काकांच्या भूमिकेत रवींद्र मंकणींनी कमालच केली आहे. एकीकडे इनामदारांच्या गतवैभवाचा दुराभिमान व भविष्याबाबतचा भाबडा स्वप्नाळूपणा तर दुसरीकडे जुन्या काळचा प्रातिनिधिक घरगुती प्रेमळपणा त्यांनी नुसता ’होsSS’ असा हेल काढून पेललाय. दुर्बळ मनाचा आणि निराशेमुळे सत्यापासून दूर पळणारा दादा (तेव्हा star नसलेल्या) अतुल कुलकर्णीने चपखल रंगवलाय. अंथरूणाला खिळून असणारी म्हातारी आज्जी आणि घरातला विश्वासू पण विक्षिप्त नोकर उत्तम वातावरण निर्मिती करतात. रेणुका दफ़्तरदार यांची कृष्णाताई देखील उत्तम (मात्र काही ठिकाणी त्यांचे संवाद स्पष्ट ऐकू येत नाहीत).

तरूण भास्करच्या भूमिकेत सिद्धार्थ दफ़्तरदार तर डॉ. भास्कर यांच्या भूमिकेत लेखक महेश एलकुंचवार आहेत. तरूण भास्करचा चेहरा निर्विकार ठेवणे हे व्यक्तिरेखेनुसार गरजेचे असले तरी सिद्धार्थचा अभिनयातील तसेच संवादातील नवखेपणा जाणवतो. एलकुंचवार मात्र (त्यांची पहिलीच भूमिका असूनही) डॉक्टरांच्या भूमिकेला योग्य न्याय देतात.

पण कादंबरी जशी कितीही पात्रे आली तरी शेवटी लेखकाची असते, तसा वास्तुपुरुष देखील खर्‍या अर्थाने सुमित्रा भावे आणि सुनील सुकथनकर या दिग्दर्शकद्वयीचा आहे. सनसनाटी काहीतरी घडवून आणण्याच्या अनेक संधी संपूर्ण चित्रपटभर उपलब्ध असूनही त्यांनी कुठेही तोल जाऊ दिलेला नाही. वास्तव आयुष्याचा (प्रसंगी नीरस) वेग त्यांनी शेवट पर्यंत टिकवलाय. एकेक व्यक्तिरेखा त्या त्या वैशिष्ट्यांसह उभी करताना कोणत्याही एका बाजूच्या समर्थनाच्या किंवा उदात्तीकरणाच्या भानगडीत ते पडलेले नाहीत. सर्व प्रसंगातून एक सलग परिणाम घडवण्यात ते यशस्वी ठरतात.



चित्रपटाचा खरा उत्कर्षबिंदू मात्र अंतर्मुख विद्यार्थी भास्करने तेव्हा न दिलेल्या प्रतिक्रिया डॉ. भास्करांनी त्या त्या frame मध्ये शिरून ४० वर्षांनी पूर्ण करण्यात आहे. आई, वडील आणि दादा यांना एकाच मोजक्या वाक्यात आणि वास्तुपुरुषाला तर नुसती धाव घेऊन दिलेल्या या संयत प्रतिक्रिया एखाद्या सुवासिनीला कुंकू लावून तिच्या सौभाग्याचा गौरव करावा तशा प्रतिकत्मक आणि सूचक आहेत. (चित्रपट तिसर्‍यांदा पाहिला तेव्हा कुठे मला हे कळलं.)

चित्रपटाच्या शेवटी वाड्याच्या जागी नवीन रूग्णालय उभारायचं डॉक्टर ठरवतात आणि वास्तुपुरुषाची खर्‍या अर्थाने शांत होते.

वास्तुपुरुष हा मी पाहिलेल्या सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक आहे. अर्थात कादंबरी हा प्रकार काही सगळ्यांनाच रूचत नाही. पण ज्यांना रूचतो त्यांना वास्तुपुरुष पाहताना विलक्षण उत्कट अनुभव आल्याशिवाय राहणार नाही.


*खरंतर वास्तुपुरुष २००३ सालचा. त्यामुळे आता ५ एक वर्षांनी यावर लिहायचे वास्ताविक काही प्रयोजन नाही. पण चित्रपट इतका आवडला की रहावलं नाही.

*२००३ साली निवड समितीने National Award for Best Film म्हणुन एकमुखाने वास्तुपुरुषची निवड केली होती. परंतु तांत्रिक कारणांमुळे (Censor Board Certificate २००२ सालचे होते का असेच काहीतरी) तो प्रस्ताव रद्द झाला. २००४ साली ’श्वास’ने याची भरपाई केली.

- नीरज (२७ एप्रिल, २००८)

Tuesday 29 January, 2008

वळू (Valu - The Wild Bull)


२६ जानेवारी. छानपैकी सहल काढावी का दिवसभर निवांत लोळून संध्याकाळी मग ‘डोक्याला-ताप-नाही’ छाप हिंदी सिनेमा हाणावा या विवंचनेत बरीचशी डोकी गुंतलेली. अशा वेळी सकाळचं झेंडावंदन झाल्यावर माझी पावले ‘वळू’ची तिकीटे काढायला कोथरूड सिटी प्राईड कडे वळतात.

‘वळू’. ‘सकाळ’मध्ये एका मराठी चित्रपटाची जाहिरात अख्खा आठवडाभर पाहून मन आधीच सुखावलेलं. आणि शुक्रवारी प्रदर्शनाच्या दिवशी तर चक्क अर्धा पानभर रंगीत जाहिरात!! मराठी चित्रपट पुण्यात एकावेळी सात ठिकाणी प्रदर्शित होऊन किती वर्षे लोटली असतील? मुंबईत बारा चित्रपटगृहात आणि महाराष्ट्रात १७-१८ शहरांतून एका वेळी प्रदर्शित होण्याचे भाग्य निदान अलीकडच्या कोणा मराठी चित्रपटाला लाभले असेल असे वाटत नाही. ही बहुदा सुभाष घईंच्या मुक्ता आर्टसची किमया. मुक्ता आर्टसने वितरीत केलेला हा पहिलाच मराठी चित्रपट.

माझी उत्सुकता केवळ यामुळे नव्ह्ती. FTII चा विद्यार्थी उमेश कुलकर्णीच्या या पहिल्या दिग्दर्शन प्रयत्नाबद्द्ल पेपरात वेळोवेळी वाचलेलं होतं. Pune International Film Festival 2008 मध्ये Best Director चा सन्मान आणि मग Holand च्या Rotterdam International Film Festival मध्ये लागलेली वर्णी यामुळे ही कुतुहल होतं.

गेली काही वर्षे मराठी सिनेमा multiplex मध्ये बघायचा तर तो छोट्यात छोट्या hall मध्ये बसून. पण ‘वळू’ चक्क मोठ्या hall मध्ये लागलेला आणि तरीही housefull झालेला पाहुन सुखद धक्का बसला.



पण मुख्य चित्रपटाचं काय? अतुल कुलकर्णी, मोहन आगाशे, दिलीप प्रभावळकर, निर्मिती सावंत, अमृता सुभाष, ज्योती सुभाष अशी तगडी नटमंडळी असली म्हणजे अभिनयाबद्दल वादच नको. पण तरी पडद्यामागची सगळी टीम नवीन; त्यामुळे धाकधुक होती. मात्र ‘वळू’ने अपेक्षाभंग केला नाही.

पहिल्या काही मिनिटांतच जाणवले की चित्रपटाची तांत्रिक अंगे अगदी उच्च दर्जाची नसली तरी पुरेशी सफ़ाईदार आहेत. मुख्य म्हणजे संकलन (editing). अजून देखील ब-याच मराठी चित्रपटांत संकलनाची बोंब असते. मग पडद्यावरचे कलाकार किती का आटापिटा करोत. साध्य होतो तो फ़क्त रसभंग. इथे तो प्रश्न नसल्याचे पाहून चित्रपटाचा आनंद घ्यायचा मार्ग मोकळा झाला.

कथा अगदी सहज सोपी. आड-वळणं नसलेली. एका खेड्यात देवाच्या नावाने सोडलेला बैल (हाच वळू) बिथरतो आणि त्याला पकडायला म्हणून एका वनाधिका-याला गावात पाचारण केले जाते. तो आल्यावर गावातल्या वेगवेगळ्या माणसांच्या वैयक्तिक आणि संपूर्ण गावाच्या एकत्रिक प्रतिक्रियेचं चित्रण म्हणजेच हा चित्रपट. माणसांच्या वागण्या-बोलण्यातील विसंगतीवर सहजपणे बोट ठेवत अगदी खुमासदार शैलीत कथा पुढे सरकते. द. मा. मिरासदार किंवा शंकर पाटलांची एखादी कथा वाचत असल्याचा भास होत रहातो.

या कथेला न्याय द्यायचा तर १-२ प्रमुख पात्रांवर अवलंबुन न राहता गावातलं एक एक व्यक्तिमत्व अनेक बारकाव्यांसह उभे करणं आवश्यक होतं. त्यात दिग्दर्शकाला चांगलंच यश आलंय. छोट्या छोट्या प्रसंगातून एकेक व्यक्तिमत्व उठाव घेत जातं. विशेषत: जीवन (गिरीश कुलकर्णी), आबा (नंदु माधव), सांगी (अमृता सुभाष), सखुबाई (ज्योती सुभाष), सौ. भटजी (निर्मिती सावंत), सरपंच (मोहन आगाशे), सौ. सरपंच (भारती आचरेकर), तानी (विणा जामकर), सत्या (सतीश तारे) या व्यक्तिरेखा अगदी ठसठशीतपणे समोर येतात.

त्यामानाने स्वानंद गड्ड्मवारची व्यक्तिरेखा तेवढी एकसंध वाटत नाही (का अतुल कुलकर्णीकडुन आताशा आपण जरा जास्तच अपेक्षा करतोय कोणास ठाऊक... सचिन तेंडुलकर सारख्या). पण स्वभावातला/ भाषेतला शहरीपणा, त्यातुन गावात वावरताना येणारा अनैसर्गिकपणा, फार ताणून न धरण्याची वृत्ती आणि या सर्वांवर उठून दिसणारी संवेदनशीलता हे सगळे रंग अतुल कुलकर्णीने चोख दाखवलेत.

काही प्रसंग योग्य परिणाम साधून जातात. काही प्रसंग गालातल्या गालात हसवतात. तर काही अगदी खदखदून. पण पात्रांना जेवढा उठाव आहे, तेवढा सर्वच प्रसंगांना मात्र येत नाही. Documentary ‘काढताना’ निवेदनातून येणारे काही प्रसंग अचानक येतात. काही अनावश्यक वाटतात. काही विसरले जातात. पण प्रत्येक प्रसंग साधा-सरळ ठेवल्याबद्दल दिग्दर्शकाचं अभिनंदन करायला हवं.

सुधीर पळसानेचा कॅमेरा गावातलं वातावरण छान टिपतो. मराठीत अभावानेच दिसणारी रात्रीचे प्रसंग काळ्याऐवजी निळ्या रंगात दाखवणारी film वापरल्याने रात्रीचे प्रसंगही छान चित्रित झाले आहेत. १-२ प्रसंगात मात्र दृश्ये धूसर दिसतात.

मंगेश धाकडेचं पार्श्वसंगीत उत्कृष्टच. ग्रामीण बाज नेमका पकडतानाच वाहवून न जाता काही प्रसंग संगीत अजिबात टाळून परिणामकारक केलेत (उदा. वळू पकडला जातो तो प्रसंग).

बरेच चांगले मराठी चित्रपट मध्यंतरानंतर आदर्शवादाच्या किंवा बोधवादाच्या मागे हरवून परिणामशून्य होतात. इथेच वळू सरस ठरतो. अनेक मोह टाळून रोजच्या जीवनातल्या सरळ, विसंगत वास्तवाची कास चित्रपट शेवटपर्य़ंत टिकवून धरतो. जे काही सुचवायचं आहे ते कसलाही आव न आणता अलगदपणे सांगून जातो.

सुरवातीस सुटया-सुटया प्रसंगांचं शेवटी आपसूक एक सुसंगत कोलाज बनत जातं. सरपंचांचं अवघडलेपण राजकारणातील नव्या आव्हानामुळे, तर आबांचं अवघडलेपण योग्य संधी न मिळाल्याने, शिवा-सांगीची निराळीच घुसमट तर भटजींचं दु:ख आणखी वेगळं. वेडी जनाई कसल्याशा अगम्य भूतकाळाने अवघडलेली. तर चंद्री गाय वात्सल्याच्या चाहुलीने अवघडलेली. प्रत्येकाचं हे वेगवेगळं वैयक्तिक अवघडलेपण हळूहळू गावाचं सर्वव्यापी अवघडलेपण बनत जातं. आणि वळूच्या स्वातंत्र्याचा शेवट हे त्याचं सामायिक उत्तर ठरत जातं. शेवटी वळू जखडला जातो. काही गुंते त्यामुळे सुटतात. काही त्याशिवाय सुटतात. काही आपोआप सुटतात. तर काही नवीन तयार होतात. चित्रपट संपतो. आयुष्य चालू रहातं.

गेली अनेक वर्षे अवघडलेला मराठी चित्रपट अलिकडे मोकळा होतोय. ‘वळू’ सर्वांनी पहायलाच हवा. केवळ मराठी चित्रपट म्हणून नव्हे. तर दर्जेदार चित्रपट म्हणून.

- नीरज (२९ जानेवारी, २००८)